बुधवारी विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर यांनी निशिकांत दुबेंना गाठलं. या तिघींनी लगेच त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या मराठी माणसांबद्दलच्या विधानांबाबत जाब विचारला. “मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा ? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही… मराठी भाषकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही” अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सर्वांसमोर संसदेच्या लॉबीमध्येच सुनावले.
यानंतर या महिला खासदारांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणाबाजी केली. दुबे गोंधळलेल्या अवस्थेत या तिघींसमोरुन निघून गेले.त्यानंतर लोकसभेत खासदार निशिकांत दुबे हे काश्मीर प्रकरणावर बोलत होते. त्यावेळी त्यांना विरोधी बाकावर बसलेल्या खासदारांकडून विरोध होत होता. तसेच शेरेबाजी केली जात होती. यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांना उद्देशून त्यांनी भाष्य केले. वर्षा गायकवाड यांना हेदेखील माहिती नाही. लॉबीमध्ये जे चालत ते मजा मस्ती असते. त्याच्या बातम्या नाही होऊ शकत असे निशिकांत दुबे म्हणाले.