छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला अटकेची भीती दाखवत 78 लाख 60 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांना आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने गंडा घालण्यात आला आहे. “मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय, मी तुम्हाला मदत करेन”, असं सांगून त्यांचा विश्वास संपादित करण्यात आला.
संभाजीनगरात एक वृद्ध दाम्पत्याला सायबर भामट्याने तब्बल 78 लाखांचा गंडा घातला आहे. तुमच्या खात्यातून मनी लॉन्ड्रिंग झाली आहे. तो एक दहशतवादी आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. त्या दहशतवाद्याने तुम्हाला 20 लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक होईल अशी खोटी बतावणी करुन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 2 ते 7 जुलैच्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी फिर्यादीवरून संजय पिसे व त्याच्या सहकाऱ्यावर क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठास 2 जुलै रोजी एकाने व्हिडिओ कॉल केला. मी पोलिस अधिकारी संजय पिसे बोलतोय, तुमच्या पत्नीच्या आधार कार्डवर सिम खरेदी करून त्यातून दोन कोटींची मनी लॉन्ड्रिंग झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवादी अब्दुल सलाम यास अटक केली आहे. त्याने तुम्हाला 20 लाख रुपये दिले आहेत अशी खोटी माहिती देत त्यांना धाक दाखवला.
त्यानंतर 4 जुलै रोजी त्यांना पुन्हा व्हिडिओ कॉल आला. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे भासवत धीर देत विश्वास संपादन केला. तुमची दोन पातळीवर चौकशी होईल असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने चौकशीला सहकार्य करून त्यांच्याकडील एफडीची एकूण 69 लाख रुपये तीन वेगवेगळ्या खात्यावर आरटीजीएस केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा व्हिडिओ कॉल करून 9 लाख 60 हजार रुपये वळते केले.
मात्र मोठ्या प्रमाणात पैसे जात असल्याने वृद्ध इसमाने आपल्या जावयास हा प्रकार सांगितला आणि हा प्रकार उघड झाला. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.