अखेर प्रशांत कोरटकरला अटक

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे. तो गेल्या चार दिवसांपूर्वीच चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. तेथून तो थेट तेलंगणात पळाला होता. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन तेलंगणातून अटक केली आहे.

प्रशांत कोरटकरविरोधात नागपूर, कोल्हापूर व जालना येथे गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिल्यानंतरदेखील कोरटकर समोर आला नव्हता. आता त्याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर येथील पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. मात्र, त्याच्या निवासस्थानी तो आढळला नाही. पोलीस पथकाने चंद्रपूर व मध्यप्रदेशमध्येदेखील त्याचा शोध घेतला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याचा शोध सुरू होता. नागपूर सायबर पोलीस ठाण्याचीदेखील मदत घेण्यात आली होती.

चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये प्रशांत कोरटकर मुक्कामी होता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपुरात छापा घातला. मात्र, काही तासांपूर्वीच त्याला पोलिसांबाबत माहिती मिळाल्याने तो पळून गेला. फॉरेन्सिक लॅब मधील तपासणीसाठी आणि आवाजाचे नमुने घेण्यासाठी कोरटकर यांना अटक होणे गरजेचे होते. मात्र, अंतरिम जामीन मिळाल्याने कोरटकरला अटक करता येत नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here