टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ आता महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे. त्याने महाराष्ट्र संघाची निवड केली असून, सोमवारी २०२५-२६ हंगामापूर्वी महाराष्ट्रात दाखल झाला. याची घोषणा राज्य प्रशासकीय मंडळाने केली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबई सोडून दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती. ही विनंती प्रशासकीय मंडळाने मंजूर केली.
मुंबई संघातून त्यांना गेल्या काही काळात वगळण्यात आले होते. फिटनेस आणि शिस्तभंगाच्या कारणांमुळे त्याला वगळण्यात आले होते. त्याने अखेरचा सामना मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध खेळला होता.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या आगमनाची अधिकृत घोषणा करताना म्हटलं, “पृथ्वी शॉ यांचं महाराष्ट्र संघात येणं हे भारतीय स्थानिक क्रिकेटसाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे संघाला बळ मिळेल.” पृथ्वीने भारतासाठी सर्व तीन फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे, टी२०) प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांची IPL मधील कामगिरी देखील अनेकदा संघासाठी निर्णायक ठरली आहे.
आपल्या निर्णयाबाबत बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला,“या टप्प्यावर मला वाटतं की महाराष्ट्र संघात जाणं हे माझ्या क्रिकेट प्रवासासाठी योग्य पाऊल ठरेल. मुंबईकडून खेळताना मला खूप काही शिकायला मिळालं. त्या संधींसाठी मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा कायम ऋणी राहीन. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने गेल्या काही वर्षांत खेळाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती केली आहे. अशा सकारात्मक वातावरणाचा फायदा मला निश्चितच होईल. ” असेही त्याने नमूद केले.