भारताच्या अंडर १९ संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज पृथ्वी शॉ याला मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. भारतीय संघासाठी त्याने शेवटचा सामना २५ जुलै २०२१ रोजी खेळला होता. मात्र २५ वर्षांच्या या क्रिकेटरचं देशांतर्गत क्रिकेटमधील करिअर सुद्धा फार चांगलं सुरु नाहीये. त्याच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. असं असतानाच पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. देशांतर्गत क्रिकेटचं पुढील सत्र सुरु होण्यापूर्वी पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पात्र लिहून न हरकत पत्र देण्याची विनंती केली आहे.
क्रिकेटर पृथ्वी शॉला एका राज्याच्या क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे. पृथ्वी शॉने एमसीएला पात्र लिहीत म्हटले की, ‘करिअरच्या या टप्प्यावर मला एका दुसऱ्या राज्याच्या क्रिकेट असोसिएशनकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे. मला विश्वास आहे की यामुळे मला क्रिकेटपटू म्हणून आणखी विकास आणि प्रगती करता येईल. हे लक्षात घेता, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की मला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्यावे जेणेकरून मी येत्या स्थानिक हंगामात नवीन राज्य संघटनेचे अधिकृतपणे प्रतिनिधित्व करू शकेन’.