पुण्यातील गर्भवती मृत्यूप्रकरणी सुषमा अंधारे यांचं भावूक पत्र!

पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्र लिहिलं आहे.

सुषमा अंधारे लिहितात, काल परवा सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिने जीव गमावला. मातृत्वाची अनिवार ओढ दुःखद करुण कथेमध्ये विसावली. रुग्णालय प्रशासनावर काही कारवाई होईल का यावर शंकाच आहे. रुग्णालयाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली. सरकारही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहायता कक्ष यांचा भोंगळ कारभार उघडा पडला. नेमलेले आयोग, समित्या चहा बिस्किटांपुरत्या असे सीमीत राहतील. आजवरच्या कुठल्याही आयोग किंवा समितीने सरकारी यंत्रणेला दोषी धरलेलं नाही किंवा तसा अहवाल दिला तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही.

अजून आठ पंधरा दिवसात रुग्णालय प्रशासन आणि सरकारचे लागेबांधे यामध्ये मानवी जीवाचा कोलाहल विरून जाईल. असंवेदनशीलता हलगर्जीपणा दप्तर दिरंगाई, दवाखान्यांचे कत्तलखान्यातले रूपांतर याही चर्चा हळूहळू मागे पडतील. पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहील. मुळात हा जीव का गेला. दहा लाख रुपये जर या कुटुंबाकडे असते तर हा जीव वाचला असता का? ज्या देशाचे पंतप्रधान ऑन रेकॉर्ड सांगतात की ८० कोटी जनता रेशनिंगचे धान्य खाते. अशा रेशनिंगचा धान्य खाणाऱ्या जनतेला एका प्रसुतीसाठी १० ते २० लाख रुपये दवाखान्यात भरणे शक्य आहे का?

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्वियसहाय्यक म्हणणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी ? सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा चा मृत्यू हे एक निमित्त आहे. पण या निमित्ताने संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे. कुठल्याही पुढाऱ्याच्या मागे कार्यकर्ता दिवस-रात्र पळत असतो. नेत्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा करत नाही आपली बायका मुलं रस्त्यावर येतील का.. त्यांच्या काही दैनंदिन गरजा आहेत का ? आरोग्य , शिक्षण, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाली आहे का ? याचाही विचार न करता कार्यकर्ता पुढार्‍यांच्या मागे उर फुटेस्तोर, धावत राहतो. त्याच्या या धावण्याची किंमत नेता बनवणाऱ्या संबंधिताला खरंच असते का ?

खरंच एखाद्या आमदाराच्या घरातल्या स्त्रीला अशा आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती तर आमदार कुठल्यातरी योजनेमध्ये बसवता येते का किंवा अजून कुणाकडून फोन करता येतील का यासाठी धडपडत राहिले असते की, रुग्णालय प्रशासनाला पुन्हा कधीतरी धडा शिकवता येईल पण आत्ता आपल्या घरातल्या स्त्रीचा जीव वाचवणे गरजेचे आहे याचा विचार केला असता.. मला जर माझ्या कार्यकर्त्याला जो माझ्यासाठी २४/७ घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ काम करत असेल. आणि त्याच्या कुटुंबाप्रति माझ्या जबाबदारीचा मला भान नसेल तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर.. !!! असे सुषमा अंधारे यांनी पत्रात लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here