ससूनमधील रिक्त पदं लवकरच भरणार! मंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

पुण्यातील ससून रुग्णालय हे कायम वादात असते. आता आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून ससून रुग्णालयातील गैरसोयींना वाचा फोडली. ससूनमध्ये डॉक्टर, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, औषधे उपलब्ध नसतात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पुण्यातील ससून रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. आता या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. ससून रुग्णालयातील पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले.

अधिवेशन संपल्यानंतर ससूनचा दौरा करण्याचे आश्वासन माधुरी मिसाळ यांनी दिले. ससून रुग्णालयात वर्षाला 5500 बाह्य रुग्ण येतात. रुग्णालयात 1800 खाटांची सुविधा असून, 155 आयसीयू बेड आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच रुग्णालयात औषधांचा तुटवडा नसून आपण 12 कोटी 94 लाख रुपयांची औषधे खरेदी केली आहे. त्याचबरोबर उपकरणांची खरेदीही केली आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येत असल्याने काही प्रमाणात गैरसोय होत असल्याचे माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.
ससून रुग्णालयाला 2300 पदे मंजूर आहेत, त्यातील 769 पदे रिक्त आहेत, त्यात 156 नर्सिंगची पदे आहेत. रुग्ण वाढत आहेत आणि कर्मचारी कमी पडत आहेत. ही पदे भरण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चतुर्थ श्रेणी वर्गातील 50 टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भरली जातात. ही पदे ताबडतोब भरावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असं आश्वासन माधुरी मिसाळ यांनी दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here