पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी दत्तात्रय गाडेने महिला छेडछाड तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्याच्या छेडछाडीला कोणी बळी पडले असल्यास त्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.
स्वारगेट स्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास पिडीत तरुणीला ताई म्हणून तसेच वाहक असल्याच सांगून एका उभा असलेल्या शिवशाहीत नेहून अत्याचार केल्याची घटना घडली. जीवे मारण्याची धमकी देऊन दोनदा अत्याचार केला. घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी या नराधम दत्तात्रय गाडेला गुनाट या त्याच्याच गावातील शेतातून पकडले. आरोपी गाडेच्या अटकेनंतर या घटनेला वेगळ वळण लागलं.
गाडेवर यापूर्वी महिलांना लुटल्याचे ५ गुन्हे पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर येथे दाखल आहेत. तो काही वर्ष मोटारचालक म्हणून काम करत होता. महिलांना गावी सोडण्याच्या बतावणीने तो त्यांना निर्जन ठिकाणी नेहून लुटत होता. त्यामुळे त्याची गुन्हेगारी पाश्वभूमी विचारात घेऊन पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास त्वरीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार द्यावी,’ असे आवाहन देखील करण्यात आले आहे.