महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जाणार आहे. याच तयारी दरम्यान शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या एका बॅनरवर ठाकरेंच्या चार पिढ्या पाहायला मिळाल्या. यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो बॅनरवर आहेत. अनेक वर्ष मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो नव्हता पण यंदा एका बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो पहायला मिळाला. या बॅनरनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की काय? अशी चर्चा देखील रंगली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी कोणत्याही बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरले नव्हते. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी, “माझा फोटो वापरायचा नाही”, असं राज ठाकरे यांना सांगितलं होते. त्यानंतर ते आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत राज्य सरकारकडून समावेश करण्यात आला. त्यामुळं त्यांचा फोटो कुणालाही वापरता येवू शकतो, असा युक्तीवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच केला होता. आता बाळासाहेबांचा फोटो वापरणाऱ्या पक्षांमध्ये आता मनसेचीही भर पडली. त्यामुळे आता तीन पक्ष बाळासाहेबांचे फोटो वापरू लागले आहेत.
बॅनरबाबत मनसेकडून स्पष्टीकरण
मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी या बॅनरवरुन स्पष्टीकरण दिले की, “ज्याने बॅनर लावला तो पक्षाचा सुरुवातीपासूनच कार्यकर्ता आहे. भावनेच्याभरात त्याने हे बॅनर्स लावले असून हे बॅनर्स लवकरात लवकर काढण्यात येतील,” असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे. ज्या तरुण कार्यकर्त्याने ही बॅनर लावले त्याच्याशी मी बोललो. संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांनी देखील त्याच्याशी संवाद साधला आहे. हे बॅनर काढले जातील,” असं किल्लेदार यांनी स्पष्ट केलं आहे. मुनाफ ठाकूर नावाच्या कार्यकर्त्याने हे बॅनर्स लावले होते.