मुंबईत मराठी येणं गरजेचं नाही असं म्हणणाऱ्या भैय्याजी जोशींना राज ठाकरेंचे खडे बोल!

मुंबईत वारंवार मराठी भाषिक आणि परप्रांतीय यांच्यात वाद होत आहे. मराठी माणसाला अनेकदा मारहाण, अपमानाला सामोरं जावं लागतय. त्यातच मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा शिकण्याची गरज नाही, असं वक्तव्य करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते भय्याजी जोशी यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं आहे. तुमचं हे वाक्य मराठी माणूस कधी विसरणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

भैय्याजी जोशी नेमकं काय म्हणाले?

मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही. मुंबई उपनगरातील विद्याविहार परिसरातील कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले होते.

राज ठाकरेंचा थेट इशारा

देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल, असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? हे काय चाललयं हे न समजण्याइतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव? अशा शब्दात राज ठाकरेंनी सुनावलं.
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये? या असल्या काड्या घालून (अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच ! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं ! असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here