हिंदी भाषेसंदर्भातील शासन आदेश मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी ठाकरेंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकली यावरुन टोला लगावताना ठाकरेंची मुलं इंग्रजीतून शिकली असं म्हटलं होतं. याच टीकेला राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
“काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करता. आता माघार घेतली ना मग वेगळ्या ठिकाणी वळवा प्रकरण! ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडीयममध्ये शिकली, बरं शिकली मग पुढे काय?” असा सवाल राज यांनी विचारला. पुढे बोलताना, “दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षणमंत्री, फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकला याचा काय संबंध?” असा प्रश्नही मनसे अध्यक्षांनी विचारला.
“अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो, आमची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली. यांची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली मग यांना मराठीचा पुळका कसा? सन्माननिय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का?” असा सवाल राज यांनी उपस्थित केला. “लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का. अडणवाणी कॉनव्हेंट स्कूलमध्ये शिकलेत,” असं राज म्हणाले.