राज ठाकरेंनी मनसैनिकांना केली विनंती, म्हणाले आता थांबवा…

राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. त्यानुसार, मनसैनिकांनी महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला. मात्र आता राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सोशल मीडियावर पत्र लिहित हे आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटलं आहे, “सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.”

“पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?”, असं राज ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here