प्रचंड उत्साही वातावरणात मुंबईतील वरळी डोम इथं ठाकरे बंधूंच्या वतीनं विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि तिथं उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना एकाच व्यासपीठावर पाहून अनेकांचाच ऊर अभिमानानं भरून आला. यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची एक आठवण सांगितलं, एका अशा क्षणाची जिथं त्यांनी सत्तेवर लाथ मारली.
”एक दिवस मी ‘मातोश्री’ला खाली बसलो होतो. दुपारची वेळ होती. अचानक दोन गाड्या लागल्या. साधारण साडेतीन चार वाजले असतील. ते प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली आणि म्हणाले बाळासाहेबांना भेटायचंय. त्यावर मी (राज ठाकरे) म्हणालो, ‘आता ते भेटणार नाहीत. ही त्यांची झोपायची वेळ आहे’. तरीही ते म्हणाले अर्जन्ट आहे. मी म्हणालो ते नाही भेटणार. शेवटी त्यांना विचारलं विषय काय आहे सांगा मी त्यांना कळवतो. यावर ते म्हणाले त्यांना सांगा मुख्यमंत्रीपजदाचा विषय झालेला आहे. सुरैशदादा जैन यांना दोन्ही बाजूंनी आम्ही मुख्यमंत्री करायचं ठरवलं आहे. ऐकून मी वर गेलो. बाळासाहेबांच्या रुममध्ये काळोख आणि शांतता होती. आम्ही अरेतुरेमध्ये बोलायचो, त्यामुळं मी म्हटलं, ‘ए काका उठ, ते खाली सगळे जावडेकर वगैरे आले आहेत; ते म्हणाले मुख्यमंत्रीपदाचा विषय झालाय’. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, म्हणाले ‘काय झालं?’ त्यावर मी म्हणालो, ‘सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही बाजूंनी होकार दिल्याचं म्हटलं आहेत’. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ‘त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही’. मराठी या एका विषयासाठी तिथे कळलं या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्या पोरावर झाले तो मराठीसाठी तडजोड करेल का?”