महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे मीरा रोजच्या सभेत आक्रमक रुप पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी भाषणात बोलताना सरदार वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई यांच्याबद्दल विधान केले. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव काही गुजरात्यांचा होता. याची सुरुवात वल्लभभाई पटेल यांनी केली. पुढे मोरारजींच्या आदेशाने मराठी माणसांवर गोळीबार झाला. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर गुजरातमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज ठाकरे यांनी संपूर्ण देशवासीयांसमोर माफी मागावी, अशी मागणी गुजरातमधील भाजप नेते अल्पेश कथिरिया यांनी केली आहे.
अल्पेश कथिरिया यांनी सांगितले की, राज ठाकरे यांचे हे वक्तव्य महाराष्ट्र आणि गुजरातमधील जनतेत फूट पाडण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. राज ठाकरेंचा मनसे पक्ष सध्या अस्तित्वाच्या संकटातून जातोय आणि या वक्तव्यामागे राज ठाकरेंचा पक्ष पुन्हा उभा करण्याचा राजकीय डाव असू शकतो, असेही ते म्हणाले. “सरदार वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई यांच्यासारख्या थोर नेत्यांचा आणि गुजराती समाजाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या चुकीची जाणीव ठेवून तात्काळ माफी मागावी, असे कथिरिया म्हणाले.