मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. इतके दिवस विधानसभा निकालावर राज ठाकरे उघडपणे काही बोलले नव्हते. काही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण या मेळाव्यातून त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निकालावर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी हे मौन अखेर मनसे मेळाव्यात सोडले. यावेळी त्यांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळला.
‘निवडणुका न लढवलेल्या बऱ्या…’
निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला. जल्लोष झाला नाही. लोकांमध्ये संभ्रम होता असा निर्णय कसा आला. माझ्याकडे एक राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित व्यक्ती आला. तो म्हणाला, “इतना सन्नाटा क्यों है भाई…कोई तो जीता होगा.” याचा अर्थ संघातील लोकांचाही निकालावर विश्वास नाही. असं राज ठाकरे म्हणाले.
मनसेचे आमचे राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही. त्यांच्या गावात त्यांना 1400 मते मिळत होती.
या निकालावर निवडून आलेल्या लोकांचाही विश्वास बसत नाही. सात वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव होतो. अख्खा महाराष्ट्राला या निकालाचा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या चार-पाच जागा येतील, असे वाटत असताना त्यांना 42 जागा मिळाल्या आणि जे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आले त्या शरद पवार यांना दहा जागा मिळतात. लोकांनी आपणास मतदान केले आहे, परंतु ते आपल्यापर्यंत आले नाही. ते मतदान कुठेतरी गायब झाले. अशा निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या, असंही राज ठाकरे म्हणाले.
इतके दिवस शांत असलेल्या राज ठाकरेंनी अखेर मौन सोडलं आणि निकालावर भाष्य केलं.