राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना अनुसरूनच एक सोशल मीडिया पोस्ट करण्यात आल्यानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. शिवसेना UBTच्या अधिकृत पेजवरुन करण्यात आलेल्या एका पोस्टमुळं या सर्वांच्या नजरा इथं खिळल्या आहेत.
“वेळ आली आहे एकत्र येण्याची,मुंबई आणि महाराष्ट्रासाठीशिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी” अशा आशयाची पोस्ट शिवसेना UBTच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंनी दिलेले एकत्रीकरणाचे संकेत लवकरच प्रत्यक्षात उतरतील का ? आणि गेल्या अनेक वर्षांपासून असलेली प्रतीक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याने पूर्ण होईल का? हाच सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. वरील शब्द आणि जनमानसाच्या गर्दीतून सर्वांचं अभिवादन स्वीकारणारे उद्धव ठाकरे या पोस्टमध्ये दिसत असून, आता हे शब्द नेमके काय सुचवू पाहत आहेत, याचाच तर्कवितर्क सध्या लावला जात आहे.