अखेर राजेंद्र आणि सुशील हगवणे सापडले, असा देत होते पोलिसांना गुंगारा

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये मागील आठ दिवसांपासून फरार असलेला वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही बावधन पोलिसांनी स्वारगेटजवळून ताब्यात घेतलं.

वैष्णवीचा सासरा म्हणजेच राजेंद्र हगवणे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष असून या प्रकरणानंतर त्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान मागील आठ दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे नेमके कुठे होते याबद्दलची माहिती समोर आली आहे.

१७ मे २०२५ रोजी एन्डीव्हर कारने राजेंद्र आणि सुशील हगवणे औंध रुग्णालयात वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी आले होते. या प्रकरणामध्ये आपल्याला अटक होऊ शकते अशी शक्यता लक्षात येताच राजेंद्र हगवणे थोरल्या पुत्राबरोबर रुग्णालयामधूनच पसार झाला.

हगवणे पिता-पुत्राने पोलिसांना चकवा देण्यासाठी आपली कार बदलली. दोघेही थार कारने ‘मुहूर्त लॉन्स’ येथे पोहचले. त्यानंतर दोघेही पवना येथून पावना धरण परिसरात बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी थांबले.

१८ मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे थार गाडीने आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात मुक्कामी होते.

१९ मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनीही परत कार बदलली. दोघेही बालेरो कारने पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पळून गेले.

१९आणि २० मेदरम्यानची रात्र राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये मुक्काम केला.

२० मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे पुसे गावातून पसरणीमार्गे कोगनळी येथील ‘हॉटेल हेरिटेज’मध्ये मुक्कामासाठी पोहोचले.

२१ मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही प्रीतम पाटील यांच्या शेतावर मुक्कामी होते.

२२ मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पिता-पुत्र पुण्यामध्ये दाखल झाले. दोघांनीही तीन सहकाऱ्यांसोबत एका हॉटेलमध्ये जेवण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.

२३ मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनाही बावधन पोलिसांच्या तुकडीने स्वारगेट परिसरातून अटक केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here