लखनौमधील अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या १८ व्या इंडियन प्रिमिअर लीगच्या स्पर्धेतील ६५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुच्या संघाचा सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पराभव केला. मात्र या सामन्यामध्ये आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही संघांच्या कर्णधारांना दंड ठोठावण्यात आला आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स या दोघांना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. पाटीदार शुक्रवारी झालेला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना इम्पॅक्ट सब म्हणून खेळला. त्यांच्या जागी जितेश शर्माने आरसीबीच्या संघाचे नेतृत्व केले. तथापि, या हंगामात आरसीबीचा पूर्णवेळ कर्णधार असल्याने पाटीदारला बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.
पाटीदारच्या संघाने स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेटसंदर्भातील नियमांचं उल्लंघन करण्याची ही पाटीदारची या पर्वातील दुसरी वेळ होती. त्यामुळे पाटीदारला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इम्पॅक्ट खेळाडूसह उर्वरित प्लेइंग इलेव्हनला प्रत्येकी ६ लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या २५ टक्के, जी रक्कम कमी असेल तितका दंड ठोठावण्यात आला आहे.
दुसरीकडे, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सलाही दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या संघालाही स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय कर्णधाराला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.