राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना त्यांच्या भाचीच्या म्हणजेच रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणाबाबत म्हणाल्या, “त्या घटनेला १० दिवस उलटले आहेत. तरीदेखील या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना नेमकं कोणाचं पाठबळ आहे असा प्रश्न पडला आहे. त्यांच्यामागे नेमका कोण आका आहे ते शोधायला हवं. कोणाचं तरी त्यांना पाठबळ मिळतंय म्हणूनच ते इतके दिवस फरार राहू शकले.”
त्या पुढे म्हणाल्या, “एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुली सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील सामान्य माताभगिनींच्या सुरक्षिततेबद्दल काय बोलणार. इतकी मोठी घटना होऊनही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे माझी मागणी आहे की सरकारने कायद्याचा वचक निर्माण करावा. माझी, तुमची किंवा कोणाचीही मुलगी असली तरी तिला संरक्षण मिळायलाच हवं आणि ती सरकारची जबाबदारी आहे.”
या प्रकरणातील आरोपींमागचा आका कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर रोहिणी खडसे म्हणाल्या, “तो आता पोलिसांनी शोधावा. सरकारने शोधावा. त्या आकामुळेच गुन्हेगारांना पाठबळ मिळतंय. मला वाटत नाही की पोलीस स्वतःहून दुर्लक्ष करू शकतात. गुन्हेगारांच्या पाठीशी कोणीतरी असल्याशिवाय, त्यांना मदत मिळत असल्याशिवाय ते फरार राहू शकणार नाहीत. खरंतर या आरोपींना शोधणं पोलिसांसाठी अवघड नाही. सरकारने पोलिसांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे.”