जगभरात सध्या एका व्यक्तीची चर्चा आहे. तो आहे इराकी नागरिक सलवान मोमिका. युरोपियन देश स्वीडनमध्ये कुराण जाळल्याने आंदोलक सलवान मोमिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. स्वीडिश मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलवान मोमिका जेव्हा टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत होता, तेव्हा त्याच्यावर गोळीबार झाला. 29 जानेवारी 2025 रोजी सलवान मोमिका याचा मृतदेह स्वीडनच्या सॉडेटेली भागात आढळला. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा होत्या, यावरून तो गोळीबारात ठार झाला असल्याचे स्पष्ट झाले.
का आला होता चर्चेत?
2023 मध्ये सलवान मोमिका याने इस्लामचा विरोध करत असताना कुराणची प्रत जाळली होती. इस्लामच्या पवित्र कुराण ग्रंथाची अनेक प्रती जाळल्यामुळे तो संपूर्ण जगभरात मुस्लिम देशांमध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. विशेषतः, ईदच्या दिवशी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीसमोर त्याने कुराण जाळले होते, आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्याच्या या कृत्यावर अनेक मुस्लिम देशांनी तीव्र संताप व्यक्त केला, आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याच्यावर खटला सुरू होता गुरुवारी त्याचा निकाल लागणार होता पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.
सलवान मोमिकावर झालेल्या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कुराण जाळण्याच्या घटनेनंतर तो मुस्लिम समाजाच्या रोषाचा विषय बनला होता. मुस्लिम समाजाचा त्याच्यावर राग होता. आणि त्या रागातूनच त्याची हत्या झाल्याचं बोललं जातंय.
सलवानच्या हत्येनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
काही लोकांना वाटते की सलवान मोमिकाने कुराण जाळून धार्मिक भावना दुखावल्या, तर काहींचे मत आहे की त्याच्या हत्या ही अयोग्य आहे.