महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार का याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. आता याच विषयावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. मनसे अध्यक्षांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देताना राऊतांनी, ‘दिलसे आणि मनसे’ असं म्हणत ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याचं सूचक विधान केलं आहे.
“राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेत आला असे मी मानत नाही. मुलाखतीवर चर्चा ठरत नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आले की फार गोड बोलतात पण तसे नाही आहे एकमेकांच्या बाजूला बसतील एकमेकाकडे बघून नेत्र पल्लवी करतील,” असं संजय राऊतांनी पत्रकारांशी चर्चा करताना म्हटलं. पुढे बोलताना राऊत यांनी, “आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरेंसमोर मनसेसोबत नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका असल्याचं म्हणणं ठेवलं आहे” असं विधान केलं.
मोदी शहांवर निशाणा साधत ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि दोघांवरती जनतेचा प्रेशर आहे. हे प्रेशर भावनिक आहे तसं राजकीयसुद्धा आहे. मराठी माणसाला मुंबईवर आपला अधिकार कायम ठेवायचा असेल, ईस्ट इंडिया कंपनी सुरत कंसात प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटर अमित शहा, नरेंद्र मोदी त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर त्यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल,” असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे.