उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती होणार की नाही याबद्दलचं गूढ अद्याप कायम आहे. असं असतानाच तीन दिवसाच्या पक्ष अधिवेशनामध्ये राज ठाकरेंनी पुढचं पुढे बघू असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होतील तेव्हा निर्णय घेऊ असं विधान केलं आहे. यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारताच “मी काय उत्तर द्यायला पाहिजे मी तसे उत्तर देतो,” असं विधान त्यांनी केलं. राज ठाकरेंनी निवडणुका येतील तेव्हा बघू अशी भूमिका घेतल्याचा संदर्भ देत राऊत यांनी, “राज ठाकरे यांचे काय चुकले?” असा सवाल केला. “तुम्ही जे वक्तव्य करीत आहात त्यांनी ते कॅमरासमोर बोलले का? अनौपचारिक आम्ही पण बोलतो. औपचारिक जे बोलायचे ते आम्ही लवकरच बोलू , आम्ही आशावादी आहोत,” असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्र हिताचा निर्णय घ्यायचा तो राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील. कार्यकर्त्यांच्या पावसाला आम्ही वेगळी दिशा देऊ, त्यांना योग्य दिशा देऊ” असं राऊत म्हणाले.