खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यातच आता त्यांनी आणखी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. ईडीने अटक करण्याच्या एक दिवस आधी मला एकनाथ शिंदेंनी फोन केला होता. आपण अमित शाह यांच्याशी बोलू का अशी ऑफरही त्यांनी दिली होती. मात्र आपण समर्थ असून, वर बोलण्याची गरज नसल्याचं सांगितलं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
“आम्ही नरकात गेलो असं कुठे म्हणत आहोत, तुम्हीच नरकात गेला आहात. एकनाथ शिंदेंचा काय संबंध आहे? अटकेच्या आदल्या दिवशी मला एकनाथ शिदेंनी अमित शाह यांच्याशी बोलू का असा फोन केला होता. मी बोललो काही गरज नाही. मी म्हटलं, वर बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही. काही गरज नाही, उद्या मला अटक होऊ द्या आणि तुरुंगात सोय आहे. मी पळून जाणार नाही. वरती बोलण्याची गरज नाही. मी बोलू शकतो वरती, मी समर्थ आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.