लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) खासदारांनी वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. मात्र, आता शिवसेना (उद्धव ठाकरे) या विधेयकाच्या वैधतेला कोणतेही कायदेशीर आव्हान देणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
आज दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांना, शिवसेना (उद्धव ठाकरे) वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “नाही, आम्ही याला कोणतेही कायदेशीर आव्हान देणार नाही. सभागृहा आम्ही आमचे काम केले आहे. आम्हाला जे म्हणायचे होते ते आम्ही सभागृहात मांडले आहे आणि आमचा निर्णय घेतला आहे. आता आमच्यासाठी हे प्रकरण संपले आहे.”