वक्फ दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणादरम्यान सरकारला लक्ष्य केले आहे. यावेळी राऊत यांनी त्यांच्या भाषणात मोहम्मद अली जिना यांचाही उल्लेखही केला आणि त्यांचा आत्मा सरकारमध्ये शिरला असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी सभागृहातच दावा केला की, सरकार हिंदू राष्ट्र नव्हे तर हिंदू पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
राज्यसभेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मी सर्वांचे भाषण ऐकले. गृहमंत्र्यांचे भाषण ऐकले, कायदामंत्र्यांचे भाषण ऐकले, कालपासून तुम्ही लोक मुस्लिमांची बॅरिस्टर जिना यांच्यापेक्षा जास्त काळजी करत आहात. मला असंही वाटलं की जणू बॅरिस्टर जिना यांचा आत्मा त्यांच्या कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसला आहे. आधी आपण विचार करायचो की आपण एकत्र येऊन हिंदू राष्ट्र निर्माण करत आहोत, पण आता असे दिसते की तुम्ही हिंदू पाकिस्तान निर्माण करत आहात.”