उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त रायगडावर केंद्रीय गृहमंत्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील निमंत्रितांच्या यादीवरुन आक्षेप घेतला. संभाजी राजेंना तसेच शाहू महाराजांना या कार्यक्रमाला का आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. तुमच्या पक्षात प्रवेश केला तरच त्यांना आमंत्रित करणार का? असा थेट सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. संजय राऊत यांनी साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरच्या गादीत भेदभाव केल्याचा आरोप करताना ‘अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल,” असा सणसणीत टोलाही लावला आहे.
अमित शाहांच्या उपस्थितीत रायगड किल्ल्यावर पार पडलेल्या कार्यक्रमाबद्दल बोलताना संभाजी राजेंना निमंत्रित करण्यात आलं नसल्याच्या मुद्द्यावरुन पत्रकारांसमोर राऊतांनी संताप व्यक्त केला. “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम रायगडावर करत आहात तर सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत. तर तुम्ही दोन्ही गाद्यांच्या वंशजांना निमंत्रण द्यायला पाहिजे होते,” असं राऊत म्हणाले.