महाराष्ट्रात कालपर्यंत इतर पक्षात असलेले आज नवहिंदुत्ववादी बनले आहेत. कालपर्यंत भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि स्वा. सावरकर यांना शिव्या देणारे आज भाजपात येऊन पावन झाले आहेत. आज त्यांची जी भाषा आहे, ती योग्य नाही. अशापद्धतीने देश अखंड राहणार नाही. एकाबाजूला अखंड हिंदुस्थानची भाषा बोलायची आणि दुसरीकडे दोन गटांना तोडण्याचे काम सुरू आहे, असं वक्तव्य शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांनी मंत्री नितेश राणेंचे नाव न घेता हा टोला त्यांना लगावला आहे.
ते पुढे म्हणाले, अशी परिस्थिती १९४७ पूर्वीही देशात निर्माण झाली होती. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, मी भारतात दोन राष्ट्र पाहत आहे. हे ठीक होत नाही. भाजपात नव्याने आलेले नेते देशातील वातावरण खराब करण्याचे काम करत आहे.
संघाला हाफ चड्डीवाले म्हणणारे, देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालणारे आज आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत. मटणाची वेगवेगळी दुकाने करणारे हे कोण? देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते हे सहन कसे करत आहेत? सरसंघचालक भागवत हे कसे सहन करत आहेत. अशाप्रकारच्या हलाल आणि झटक्यामुळे हिंदुत्त्वाला झटका बसेल, असेही संजय राऊत म्हणाले.