स्नॅपचॅटवरून बनावट खाते तयार करून ११ वर्षांच्या मुलीची अश्लील छायाचित्रे मागितल्याचा प्रकार कांजूर येथे समोर आला आहे. याप्रकरणी कांजूर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी विकृत असून मुलीच्या नावाने बनावट खाते तयार करून लहान मुलींना जाळ्यात ओढत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पीडिता११ वर्षांची आहे. ती कांजूर परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी स्नॅपचॅटवर तिची एका अनोळखी मुलीशी मैत्री झाली. सान्वी राव नावाने खातं असलेल्या या मुलीचं स्नॅपचॅटवरील खातं asaaanvi_rao नावाने होतं. या खात्यावरुन पीडितेशी ओळख वढवल्यानंतर पीडितेच्या अजाणतेपणाता गैरफायदा घेत सान्वी रावने तिच्याकडे अश्लील फोटोंची मागणी केली. अजाणतेपणामुळे पीडितेने संबंधित खात्यावर आपले अश्लील फोटो पाठविण्यास सुरवात केली. त्यानंतर दिवसोंदिवस सान्वी रावची मागणी वाढू लागली. त्यामुळे पीडिता अस्वस्थ झाली. फोटो पाठवले नाहीस आणि माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तुझे अश्लील फोटो इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी सान्वीने पाडितेला दिली. यामुळे पीडिता अधिकच घाबरली. अखेर तिने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
पीडितेच्या आईने तातडीने कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी सान्वी राव नाव धारण केलेल्या स्नॅपचॅट आयडीधारकाविरोधात पोक्सोच्या कलम 67 (बी), तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत. आमचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे, असे परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले आहे. आरोपी हा एखादा तरुण असण्याची शक्यता आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असेही सागर यांनी स्पष्ट केलं.