भारतामधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे काही सबळ पुरावे भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. असं असतानाच दुसरीकडे पाकिस्तानच्या मात्र उलट्या बोंबा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या हल्ल्यासंदर्भात बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने भारतावरच टीका केल्याचं पाहायला मिळालं. याच टीकेसंदर्भात एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तसेच हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना छत्रपती संभाजी नगरमधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी एका ओळीत आफ्रिदीची लाजच काढल्याचं दिसून आलं.
आफ्रिदीने भारताविरोधात बोलताना सर्व मर्यादा ओलांडताना, “जर तिथे (जम्मू आणि काश्मीरमध्ये) फटाके फुटले तरी ते (भारतीय) पाकिस्तानने केले आहे असे म्हणतात. काश्मीरमध्ये तुमचे 8 लाख सैनिक आहेत आणि तरीही हे घडले. याचा अर्थ तुम्ही निरुपयोगी आणि अक्षम आहात. कारण तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही,” असं आफ्रिदी म्हणाला. यावेळेस त्याने भारतीय सैनिकांबद्दल, “नालायक हो-निकम्मे हो,” असे शब्द वापरले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तांकनावरुनही भारतीय प्रसारमाध्यमांवरही शाहिद आफ्रिदीने टीका केली. “हल्ल्याच्या एका तासाच्या आत त्यांचे मीडिया बॉलिवूडमध्ये बदलले. सगळं बॉलिवूड बनवू नका. मला धक्काच बसला, खरं तर ते ज्या पद्धतीने बोलत होते ते मला खूप आवडलं. मी म्हणत होतो की त्यांची विचारसरणी पहा, ते स्वतःला सुशिक्षित लोक म्हणतात,” असं आफ्रिदी भारतीय प्रसारमाध्यमांवर निशाणा साधताना म्हणाला.
शहीद आफ्रिदीने केलेल्या विधानासंदर्भात छत्रपती संभाजी नगरमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ओवैसींनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना ओवैसींनी, “कोण आहे हा शहीद आफ्रिदी? का त्या जोकरचे नाव घेत आहात?” असा सवाल करत हा प्रश्न उडवून लावला.