आयफाच्या पत्रकार परिषदेदरम्यान शाहीद कपूर आणि करिना कपूर गप्पा मारत असताना त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यांच्यातील हे हलके फुलके क्षण पाहिल्यानंतर काहीजण आश्चर्यचकित झाले तर काहींना आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर तर कित्येकजण व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत होते.
स्वत: शाहीद कपूरने मात्र यावर वेळीच प्रतिक्रिया दिली आहे. आयफा डिजिटल अवॉर्ड्सदरम्यान रेड कार्पेटवर शाहीद कपूरने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने करिनासोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला. “आमच्यासाठी हे नवीन नाही. आम्ही इथे, तिथे भेटत असतो. आमच्यासाठी हे फार सामान्य आहे. जर लोकांना हे पाहून बरं वाटत असेल, तर चांगली बाब आहे”.
एकेकाळी शाहीद कपूर आणि करिना कपूर एकमेकांना डेट करत होते. बॉलिवूडमध्ये त्यांच्या नात्याची चांगलीच चर्चा होती. त्यावेळी दोघेही बॉलिवूडमध्ये नवखे होते आणि मोठे स्टार होण्यासाठी धडपडत होते. दोघांनी फिदा, चुप चुप के आणि जब वी मेट अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. जब वी मेट चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.