काही दिवसांपूर्वी यूट्यूबवरील ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि हा वाद अजूनही सुरूच आहे. अशातच आता सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते शेखर सुमन यांनीही रणवीरला खडेबोल सुनावले आहेत. शेखर सुमन यांनी, “हे विकृतीचे स्वातंत्र्य आहे. फक्त सॉरी म्हणून चालणार नाही”, असे म्हणत रणवीरला चांगलेच सुनावले आहे. तसेच सरकारकडे अशा शोवर बंदी घालण्याची आणि अशा लोकांना देशाबाहेर काढण्याची मागणी केली आहे.
एका कार्यक्रमात शेखर सुमन यांनी ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादाबाबात बोलताना रणवीर अलाहाबादियावर ( Ranveer Allahbadia ) जोरदार टीका केली. तसेच पालकांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्य ऐकल्यानंतर शेखर सुमन यांनी ‘किळस’ आल्याचेही म्हटले आहे. याबद्दल शेखर सुमन यांनी म्हटले, “पालकांबद्दल अश्लील टिप्पणी करणाऱ्या अशा लोकांना देशाबाहेर हाकलले पाहिजे.” शेखर सुमन पुढे म्हणाले, “लोक रोस्टच्या नावाखाली यूट्यूबवर अश्लील गोष्टी करत आहेत आणि त्याला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असं म्हणत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही शिव्या द्याल किंवा अशा घाणेरड्या गोष्टी कराल की, ते ऐकून एखाद्या व्यक्तीला मनस्ताप होईल.”
त्यापुढे ते म्हणाले, “मी सरकारला अशी विनंती करतो की, अशा लोकांचे हे शो सरकारने कायमचे बंद केले पाहिजेत.”