राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेबाबतचा मुद्दा चर्चेत आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हिंदी भाषेबाबतच्या सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. दरम्यान, या संदर्भात सरकार आता एक समिती स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर शिवसेना मंत्री देखील आक्रमक होणार असल्याचं बोललं जातंय.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात तिसरी भाषा घुसवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही असल्याचं चित्र आहे. कारण एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही आता विरोधात असल्याचं समोर येतंय. तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी देखील सरकारच्या या निर्णयामुळे खूश नसल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाचवीनंतर विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्यात यावी, अशी भूमिका मांडली आहे. शिवाय ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं.