मुंबईसहीत राज्यातील अनेक शहरांमधील पारा ४० अंशांच्या पार झाला आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच शीतपेयांची मागणीही वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. केवळ शीतपेयच नाही तर थंड पाण्याच्या बाटल्यांचा खपही वाढल्याचं दिसत आहे. मात्र अनेक दुकानदार हे प्रत्यक्ष एमआरपी म्हणजेच विक्रीची सर्वाधिक रक्कम आकारण्याबरोबरच प्रत्येक प्रोडक्टमागे काही रुपये अधिक आकारतात. याबद्दल जाब विचारल्यास अनेकदा हे कूलिंग चार्जेस असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जातो. मात्र अशाप्रकारे अतिरिक्त पैसे आकारणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे.
शीपपेय आणि थंड पाण्याच्या बाटल्यांची विक्री करताना एमआरपी किंमतीनुसारच करणं बंधनकारक आहे. म्हणूनच ग्राहकांनी अशावेळी अतिरिक्त शुल्क देणं चुकीचं ठरतं. ग्राहकांची फसवणूक करुन कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त पैसे आकारले जाणं चुकीचं आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड शिरीष देशपांडेंनी शीतपेयांसाठी अतिरिक्त पैसे मागण्याचा हक्क विक्रेत्यांना नसल्याचं म्हटलं आहे. ग्राहांना ग्राहक जिल्हा तक्रार मंचाकडे अशा अतिरिक्त शुल्क आकारणीविरोधात तक्रार करता येते असंही देशपांडेंनी सांगितलं.