स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण करण्यात आली. सोलापुरातील एका कार्यक्रमात स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहाडियावर जोक केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटानं हल्ला केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करुन दिली. बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘स्काय फोर्स’मधील अभिनेता वीर पहारियाबद्दल प्रणितने विनोद केल्याने तो अडचणीत सापडला आहे.
प्रणित मोरेवर हल्ला झाल्यानंतर अनेकांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. वीर पहाडियानं देखील दिलगिरी व्यक्त केली होती.
वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा हा नातू आहे. हल्ल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याची माहितीही प्रणित मोरेनं आपल्या पोस्टमधून दिली होती. अशातच आता याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून 10 ते 12 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपी तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य 10-12 साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.