मराठी मालिकांमध्ये लगीनघाई! ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकांचा महासंगीत सोहळा

मराठी मालिका विश्वात अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. मालिकेतील कलाकारांशी प्रेक्षक एकरूप होऊन जातात. मागच्या आठवड्यात झी मराठी वाहिनीवर पारू आणि लक्ष्मी निवास या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळाला. आता स्टार प्रवाह वाहिनीवर दोन मालिकांचा महासंगीत सोहळा पार पडणार आहे. ठरल तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकांमध्ये लगीनघाई सुरू आहे.
एकीकडे ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन-सायलीची लगीनघाई सुरु आहे, तर दुसरीकडे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतही नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्या यांच्याकडेही लग्नाची तयारी सुरु आहे. स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना एक अनोखा प्रयोग 9 फेब्रुवारीला अनुभवता येणार आहे. ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन मालिकांचा महासंगीत सोहळा सलग तीन तास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तीन तासांच्या या महासंगीत सोहळ्यात 33 कलाकारांची फौज दिसणार आहे. अर्जुन, सायली, नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्यासह दोन्ही मालिकेतील सर्व मुख्य कलाकार या महासंगीत सोहळ्यात दिसणार आहेत. तीन तासांचा हा अभूतपूर्व सोहळा साकारण्यासाठी 150 पेक्षा जास्त तंज्ञत्र मंडळी तीन दिवस मेहनत घेत होते. शूटिंग वेळेत पूर्ण व्हावं यासाठी दोन हुबेहुब दिसणाऱ्या सेटची निर्मिती करण्यात आली. कलादिग्दर्शक तृप्ती ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे एकसारखे दिसणार दोन सेट उभारले गेले. सलग तीन दिवस महासंगीत सोहळ्याचं शूटिंग सुरु होतं. सेटवर सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडाव्यात यासाठी निर्माते सोहम आणि सुचित्रा आदेश बांदेकर उपस्थित होते.

दोन्ही मालिकांचे विषय वेगळे आहेत.. तरीही महासंगीत सोहळ्यासाठी दोन्ही मालिका एकत्र गुंफण्याचं महत्त्वाचं काम लेखिका शिल्पा नवलकर आणि अश्विनी अंगाळ यांनी उत्तमपणे केलं. महासंगीत सोहळ्यात प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता-सागर, थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील तेजस आणि मानसी आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी अर्थात जयदीप-गौरीचा देखिल खास परफॉर्मन्सही पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here