मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकलवरचा ताण गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी आणि त्यासोबत वाढणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई रेल्वे पोलिसांतर्गत चार नवीन रेल्वे पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), भाईंदर, अंबरनाथ आणि आसनगाव या चार महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. गृह विभागाने यासंदर्भातील आदेश सोमवारी जारी केला असून लवकरच ही ठाणे प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहेत.
उपनगरीय रेल्वेस्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
गेल्या काही वर्षांत मिरा रोड, भाईंदर, अंबरनाथ आणि आसनगावसारख्या उपनगरी स्थानकांवरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, गर्दी वाढली तशी गुन्हेगारीची प्रकरणेही वाढली. चोरी, पाकिटमारी, छेडछाड, मारहाण, अपघात आणि लैंगिक अत्याचार यासारख्या घटनांनी पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

या निर्णयाचा फायदा
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे वसई पोलीस ठाण्यावरील ताण कमी होणार आहे. मुंबई ते दहाणू या विस्तृत पट्ट्यातील रेल्वे स्थानकांवरील सर्व गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी वसई पोलिसांवर होती. मिरा भाईंदर परिसरातील रेल्वे गुन्ह्यांच्या तक्रारीसाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. वसईचे अंतर खूप असल्याने तक्रारदारांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होता.
मात्र आता भाईंदरला स्वतंत्र रेल्वे पोलिस ठाणे उभारले जाणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड काढणे, गैरवर्तन करणे, मोबाईल किंवा बॅग हिसकावणे यासारख्या घटना सर्रास घडत होत्या. आता यावर आळा घालणं शक्य होणार आहे. महिलांनाही तक्रार करणं सोयीचं होणार आहे.