डोंबिवलीतील ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गाव येथील वीर सावरकर नगर येथील एका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक करण्यात आली. या ठिकाणी ३५ बालकांचे विविध खेळ स्पर्धांचे प्रशिक्षण शिबीर महिनाभरापासून घेतले जात आहे. या प्रशिक्षण शिबिरावर रविवारी रात्री आठ वाजता अज्ञात इसमांनी दगडफेक केली. याप्रकरणी कचोरे संघ शाखा चालकांच्या पुढाकारातून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कचोरे येथील वीर सावरकरनगर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा संजू चौधरी चालवितात. या शाखेत कचोरे, ठाकुर्ली परिसरातील सुमारे ३५ मुले खेळांचे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. या मुलांना प्रशिक्षक पवन कुमार विविध प्रकारचे खेळ शिकवतात. मागील महिनाभरापासून हा उपक्रम सुरू आहे. यापूर्वी एक, दोन वेळा हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना अज्ञाताने दगडफेक केली होती. पण चुकून दगड आले असावेत म्हणून त्याकडे चालकांनी दुर्लक्ष केले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान संघ स्वयंसेवक मुले मैदानात विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण घेत होती. लाठ्या काठ्या मुले खेळत होती. मैदानी खेळात काही मुले व्यस्त होती. यावेळी अचानक चौधरी वाडी मैदान भागातील झाडाझुडपांमधून प्रशिक्षण घेत असलेल्या मुलांच्या दिशेने दगड भिरकावण्यात आले. सुरुवातीला चुकून ह दगड कोणी फेकला असल्याचा संशय चालकांना आला. त्यानंतर दगड फेकण्याचे प्रमाण वाढल्याने हा हेतुपुरस्सर त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला जात असल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर संजू चौधरी, पवन कुमार यांनी या दगडफेकीत कोणा स्वयंसेवकाला काही इजा होऊ नये म्हणून मैदानी खेळ बंद केले. या दोघांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. पोलिसांनी अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.