राज्य सरकारच्या राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड लागू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. “सरकार जर सीबीएसई बोर्ड आणणार असेल तर त्यासाठी त्यांची तयारी आहे का? तुमच्याकडे तो अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक आहेत का? मागच्या आठवड्यातच राज्यातील एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे. एका बाजूला शेतकरी, शिक्षक आत्महत्या करत आहेत आणि सरकारचे मात्र भलतेच काहीतरी सुरू आहे. जे आहे, त्यासाठी सरकारकडे खर्च करायला पैसे नाहीत, मग नवी टुम का काढली जात आहे?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारने एकाबाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तर दुसऱ्या बाजूला आता एसएससी बोर्डाला हद्दपार करून मराठी भाषेची गळचेपी सुरू केली आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणल्यानतंर आम्ही त्याचे स्वागत केले होते, पण याच्या माध्यमातून आमच्या मराठी शाळांना बंद पाडत आहात, असाही आरोप त्यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “एकाबाजूला देशात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडत आहे. याबाबत मी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून जाब विचारला आहे.”
“मी एक आई आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधीही आहे. मी स्वतः एसएससी बोर्डाच्या शाळेत शिकली आहे. पालकांकडे पर्याय असला पाहिजे, असे माझे मत आहे. पालकांना सीबीएसई, आयसीएसई, एसएससी असे कोणतेही बोर्ड निवडायची मुभा असली पाहिजे. एसएससी बोर्डाची काय चूक आहे?”, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी केलाआहे.