पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या गर्भवती महिला मृत्यूप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देखील भाष्य करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सध्या अनेक रुग्णालयांत लाखो रुपयांची बिलं येतात, ही परिस्थिती भयावह असून सर्व सामान्य माणसांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल सुरेश धस यांनी केला आहे.
“सध्या कोणत्याही रुग्णालयांचे बिलं अमर्याद होत आहेत, म्हणजे गरिबांनी आजारी पडावं की नाही? इथपर्यंत विचार मनात आणण्याएवढी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल पुण्यातील घटना घडली, त्या घटनेत रुग्णाला १० लाख रुपये भरण्यास सांगितले. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की समिती नेमली जाईल. मला वाटतं आता पुढच्या चार दिवसांत समिती स्थापन होईल आणि कार्यवाही होईल”, असं सुरेश धस यांनी म्हटलं.
अनेक लोकांवर रुग्णालयांच्या बाबतीत अन्याय झालेले आहेत. विशेषत: मेडिकलच्या बाबतीत माझी तक्रार होती. एखादी ६० रुपयांची टॅबलेट सहा हजारांना मिळायला लागली तर गरिबांनी काय करायचं? आमदार योगेश सागर ते काही रुग्णालय चालवतात. त्यांनी मला खासगीत बोलताना सांगितलं ६० रुपयांची गोळीची किंमत ग्राहकापर्यंत जाईपर्यंत सहा हजार रुपये होते.या संदर्भातील मुद्दा मी देखील मांडला होता. आता काही रुग्णालयांचे मालक असतात त्यांच्या रुग्णालयात त्यांच्या मेव्हण्यांचं मेडिकल असतं. मग हे कसं होतं? काही ठराविक डॉक्टर ठराविक कंपन्यांची औषधे प्रेफर करतात. या सर्व गोष्टींचा समितीने विचार केला पाहिजे”, असंही आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.