माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना मला जंगली रमी येत नाही. मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, असे वक्तव्य केले. ज्यांना माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारादेखील माणिकराव कोकाटे यांनी दिला. राजीनामा देण्यासारखं काय घडलं? मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे का? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आता यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माणिकराव कोकाटे यांना थेट इशारा दिला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, माणिकराव कोकाटे यांची उद्धट आणि उर्मटपणाची भाषाच गंभीर आहे. त्यांना विषयाचं गांभीर्य अजूनही कळत नाही. देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात जे मंत्री आहेत त्यांना आपल्या मंत्रीपदाचा औरा कॅरी करता येत नाही. नितेश राणे मंत्री असूनही बालिश आणि समाजात दुही पसरवणारी भाषा करतात. शिरसाट यांच्यासारखा अत्यंत उद्धट माणूस मंत्रीपदावर आहे आणि माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. यावर आता यांची भाषा आहे की, आम्ही काही विनयभंग केला का? बलात्कार केला का? माणिकराव मला आपल्याला इतिहास सांगावे लागेल. मुंबई बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्यासोबत राम गोपाल वर्मा यांना फक्त घेऊन गेल्यामुळे आत्ता सत्तेत असलेले आणि तेव्हा विरोधात असलेले भाजपने गदारोळ केला होता. त्याचा परिणाम म्हणून विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.