महाविद्यालयाच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर इमोजी पाठवण्यावरून झालेल्या वादातून वर्गातील विद्यार्थिनीला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तक्रारदार व आरोपी अल्पवयीन विद्यार्थी असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
आरोपी व पीडित तरूणी ११ वीत शिक्षण घेत असून त्यांच्या वर्गाचा एक ग्रुप आहे. त्यावर इमोजी पाठवल्यावरून हा वाद झाला. त्यातून आरोपीने अनेक वेळा संपर्क साधून पीडित मुलीला त्रास दिला.
सविस्तर वृत्त असे की, २ एप्रिल रोजी एका विद्यार्थ्याने ग्रुपवर व्हॉईस मेसेज पाठवला होता. त्या संदेशावर पीडित मुलीने उलटी झाल्याचा इमोजी पाठवला होता. त्याचा राग आल्यामुळे वर्गातील मुलाने पीडित मुलीला दूरध्वनी करून, व्हॉईस मेसेज व चॅटद्वारे अश्लील शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या मुलीने याप्रकरणी थेट निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी व्हॉईस मेसेज व संदेश पाहून याप्रकरणी गुन्हा दाखल केला