लालू प्रसाद यादव यांनी त्याच्या पक्षातून आणि कुटुंबातून त्यांचे थोरले पुत्र तेजप्रताप यादव यांची हकालपट्टी केली आहे. तेजप्रताप यादव यांनी केलेल्या एका प्रेमप्रकरणामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र यामुळे बिहारचं राजकारण चांगलंच तापलं आहे. तेजप्रताप यांनी दोन दिवसांपूर्वी अनुष्का यादव नावाच्या एका तरुणीसोबतचा फोटो त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी प्रेमात असल्याची कबुली दिली होती. यानंतर विरोधकांनी लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबाला चांगलंच घेरलं आहे. तसंच तेजप्रताप यांची बायको ऐश्वर्या राय देखील लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाविरोधात आक्रमक झाल्या आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेजप्रताप यादवांनी त्यांच्या प्रेमाचा फोटोबॉम्ब टाकला आहे. या फोटोबॉम्बमुळं बिहारच्या राजकारणात मोठं वादळ आलं आहे. लालू प्रसाद यादवांनी तेजप्रतापला पक्षातून आणि घरातून निलंबित केल्यानंतर तेजप्रताप यांनी युटर्न घेत कुणीतरी एक्स अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडं तेजप्रतापची बायको ऐश्वर्या राय हिनंही लालूंच्या घराण्याविरोधात जाहीर मोहीम उघडली आहे. अनुष्का यादव हिच्यासोबत तेजप्रतापचे १२ वर्षापासून असलेले प्रेमसंबंध लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबानं का लपवले असा सवालही ऐश्वर्या राय यांनी विचारला आहे.
तेजप्रताप यादवांविरोधात ऐश्वर्या राय कोर्टात गेल्या आहेत. लालूप्रसाद यादवांचं कुटुंब हे आतून एकच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई केली असून राबडीदेवी तेजप्रतापची समजूत काढण्यासाठी केव्हाच त्याच्याकडं गेल्या असतील असा आरोप ऐश्वर्या यांनी केला आहे.