माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. हत्या झाल्यास याची सर्व नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आहे. दीपक काटे हा त्यांचा कार्यकर्ता आहे असंही ते म्हणाले आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाई हल्ल्यानंतर आरोप प्रत्योराप सुरु झाले आहेत. दरम्यान शाईफेक आणि धक्काबुक्की प्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
“आमचा सामाजिक समतेचा, बंधुतेचा आणि मानवता प्रस्थापित करण्याचा विचार आहे. 2014 पासून मनुस्मृतीच्या, वर्णवर्चस्वाच्या विचारसरणीचा म्हणजेच पुरोगामी आणि प्रतिगामी विचाराचा संघर्ष सुरु झाला आहे. अशा प्रकारच्या संघटना संपवल्या पाहिजेत अशी मीटिंग संघ परिवारात मागच्या महिन्यात झाली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी अशा पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. ही सगळी चर्चा काही माझ्या मित्रांकडून कळाली होती,” असा दावा त्यांनी केला आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, “अक्कलकोटचे जलमाजीराजे भोसले यांचा सत्कार माझ्या हस्ते होता. एक सामाजिक कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मला निमंत्रित करत गाफिल ठेवण्यात आलं. माझ्यावर हल्ला करणाऱ्यावर 10 गुन्हे आहेत. बावनकुळे यांनी कारवाई करु असं सांगितलं आहे. पण त्यांनीच पोलीस स्टेशनला फोन करुन त्याला (दीपक काटे) हवी ती मदत दिली पाहिजे असं सांगितलं”.
“दीपक काटे हे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने ते काम करतात. त्यांचा आमच्यावर छोटा आक्षेप आहे की, संभाजी यांचा एकेरी उल्लेख होत असल्याने महाराजांचा अपमान होतो. छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करा असा त्यांचा आग्रह आहे. मी त्यांनी समजावून सांगितलं की, आपल्याला धर्मादाय आयुक्तांकडे जावं लागेल. दुरुस्ती कराव्या लागतील. नंतर लक्षात आलं की, छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची संघटना मुंबईतील सचिन कांबळे नावाच्या एका कार्यकर्त्याने नोंद केली असून त्याचं काम सुरु आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.