गृहमंत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी हत्याकांड घडले आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास धंतोतीलीत एका युवकाने एका व्यक्तीची तलवारीने भोसकून हत्या केली. मागील तीन दिवसांतील हे तिसरे हत्याकांड असून या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था हादरली आहे. अंकुश देवगिरकर (३५) रा. राहुल नगर असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आयूष मंडपे (१९) रा. राहुलनगर याला अटक केली.
यापूर्वी, शनिवारी घडलेल्या हत्याकांडात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आकाश भंडारी व त्याच्या तीन साथीदारांनी मंडपवाल्याकडे मजूर असलेल्या रोहित राजेश तिवारी (२८, वानखेडे आउट,वैशालीनगर) या युवकाचा पैशाच्या वादातून खून केला. तर रविवारी अंबाझरीत दीपक गोविंद बसवंते (२८, रा. पांढराबोडी) याची कुख्यात प्रशांत ऊर्फ खाटीक गणेश इंगोले (२५, पांढराबोडी), रोशन गणेश इंगोले, राहुल ऊर्फ चोर सूर्यवंशी आणि गजानन शनेश्वर यांनी चौकात हत्या केली होती.
गेल्या तीन महिन्यांत शहरात हत्याकांड आणि महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. धंतोलीतील अंकुश देवगिरकर हा आई आणि बहिणीसह राहत होता. तो कबाडीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने देवगीरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.