बीडच्या केजमधील महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रात मोठा अनैतिक व्यवहार उघड झाला आहे. कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या चौकशीत शिवसेना ठाकरे गटाचा माजी जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे आरोपी आहे.
दीड महिन्यापूर्वी पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात केज येथील महालक्ष्मी कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा पर्दाफाश झाला होता. पोलीसांच्या एएचटीयू पथकाने केलेल्या कारवाईत १० महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना विविध जिल्ह्यांतून फसवून आणण्यात आल्याचं उघडकीस आले होते. छाप्यात व्यवस्थापक मयूर अंधारे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाच हजार रुपये रोख आणि निरोधही जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात सत्वशीला अंधारे, तिचा मुलगा आदित्य अंधारे हे मुख्य सूत्रधार होते. या ठिकाणी यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात आणखी आरोपी रत्नाकर शिंदे याचा सहभाग असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.