मंत्री उदय सामंत यांच्या नावापुढे आता डॉक्टर हे पद लागणार आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना आज अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सन्मानाने भावूक होत उदय सामंत यांनी आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात मंत्री उदय सामंत यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला विद्यापीठाचे संस्थापक डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील, विद्यापीठाचे अधिकारी, विद्यार्थी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणि मंत्री उदय सामंत झाले भावूक
डॉक्टरेट प्रदान केल्यानंतर मंत्री उदय सामंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. “आजपासून माझ्या नावासमोर ‘डॉक्टर’ लागले आहे. माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की, मी एमबीबीएस करून डॉक्टर व्हावं, पण नियतीने मला वेगळ्या मार्गावर आणले. समाजासाठी आणि राज्यासाठी कार्य करताना आज विद्यापीठाने माझ्या कार्याची दखल घेतली, याचा मला अभिमान वाटतो.” असं ते म्हणाले.
कोरोना काळातील ऐतिहासिक निर्णयांची त्यांनी बोलताना आठवण करून दिली. कोरोना काळात परीक्षा घ्यायच्या की नाही, हा प्रश्न उभा राहिला होता. तेव्हा मी विद्यार्थ्यांच्या मतांचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी माझे आभार मानले होते. तो निर्णय माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक होता,” असे ते म्हणाले. त्या निर्णयामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात उदय सामंत पोहोचले.