उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका, म्हणाले…खिशात नाही आणा…

उद्धव ठाकरेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “मी बुधवारीच तुमची भेट घेणार होतो. पण अधिवेशन उशिरापर्यंत सुरु होतं. पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने निरर्थक अर्थसंकल्प सादर झाला. थापा रुपाने ज्या गोष्टी मारल्या त्याची वाच्यता कुणीही केली नाही. अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं.” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, “खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी म्हण आहे ना तशी या सरकारची अवस्था आहे. सगळी आश्वासनं फोल ठरली आहेत. सत्तेवर आल्यानंतर या सरकारची दडपशाही सुरु झाली आहे. पण दडपशाही ब्रिटिशांना जमली नाही यांनाही जमणार नाही. शिवसेना ही एकच आहे, शिवसेनेच्या गद्दारांचा गट मी मानतच नाही. आम्हाला जेव्हा मुस्लिम मतं मिळाली तेव्हा यांचे डोळे पांढरे झाले होते. मात्र बोगस हिंदुत्ववादी किंवा बुरसटलेले लोक आहेत त्यांना सौगात ए मोदीचं निर्लज्ज उदाहरण दिसलं आहे. बटेंगे तो कटेंगे चा नारा देणारे सौगात देत आहेत. वर्षभर शिमगा करायचा आणि ईद जवळ आली की मुस्लिमांना पुरणपोळी द्यायची हे यांचं धोरण आहे. भाजपाचं ढोंग उघडं पडलं आहे. मला चिंता अशी आहे मोदी लोकसभेच्या प्रचारात म्हणाले होते की मंगळसूत्र चोरतील, आता हिंदूंचं मंगळसूत्र सुरक्षित आहे का?” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here