देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. समोर आलेल्या आव्हानांवर आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने मात करुन त्यांनी आपली विश्वासार्हता वाढवली असं उद्धव ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ राजकारणी अशी आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्राचा नायक’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्या कामगिरीवर भाष्य केलं.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘महाराष्ट्राचा नायक’ या कॉफी टेबल बुकमधून ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीन गडकरींसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केलं आहे.