माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करणारे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव चर्चेत आले आहेत. जाधव यांच्याच पक्षातील माजी आमदार राजन साळवी हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. यामुळे जाधव देखील महायुतीत जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्यातच भास्कर जाधव हे भाजपाच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे.यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य समोर आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोकणातील गडाला महायुतीने चांगलाच सुरुंग लावला आहे. विधानसभेला जाधवांचा मतदारसंघ वगळता तळकोकणातील एकही मतदारसंघ ठाकरेंना सुरक्षित राखता आला नाही. सावंतवाडी, कुडाळ आणि राजापूर, रत्नागिरी असे सर्व मतदारसंघ गमवावे लागले. यामुळे जाधवांच्या नाराजीला महत्व प्राप्त झाले आहे. “महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावतं. पण माझं दुर्दैवं मला सतत आडवं आलं आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही,” असे जाधव म्हणाले होते.
या नाराजीमुळे जाधव पुढे कोणते पाऊल उचलणार असा प्रश्न विचारला जात आहे. जाधव हे काही काळ राष्ट्रवादीमध्ये देखील होते. पुन्हा ते शिवसेनेत परतले होते. यामुळे ते शिंदे सेनेत जाणार की राष्ट्रवादीत की भाजपात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भास्कर जाधव यांच्या राजकीय आयुष्याबद्दल प्रश्नचिन्ह लावू नका, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी आमच्याशी संपर्क केलेला नाही, असेही स्पष्ट केले आहे.