अमेरिकेने पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना देशात प्रवेश नाकाराला. के. के. एहसान वॅगन असं या उच्चाधिकाऱ्यांचं नाव असून त्यांच्या व्हिसामध्ये आक्षेपार्ह नोंदी आढळल्याचा दावा अमेरिकी प्रशासनाने केला आहे.
पाकिस्तानचे तुर्कमेनिस्तानमधील उच्चाधिकारी वॅगन सोमवारी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस विमानतळावर उतरले. विमातनतळावर त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. वॅगन यांच्या कागपपत्रांमधील आक्षेपार्ह मुद्द्यांवर आक्षेप घेत त्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्या कागदपत्रांमध्ये असणारा मजकूर नियमांना धरून नसल्याचं नमूद करत अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी वॅगन यांना त्यांच्या आधीच्या ठिकाणी परतण्यास सांगितलं. त्यामुळे अमेरिकेतील व्हिसाविषयक नियम, उच्चाधिकाऱ्यांसंदर्भातले प्रोटोकॉल्स आणि या प्रकरणात करण्यात आलेली कारवाई, यावर संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेकडून मात्र या कारवाईबाबत कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
कोण आहेत वॅगन?
के. के. एहसान वॅगन यांनी पाकिस्तान सरकारसाठी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यात त्यांच्यावर याआधी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या काठमांडू येथील दूतावासात सहाय्यक सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याशिवाय, लॉस एंजेलिस येथील पाकिस्तानचे डेप्युटी कौन्सिल जनरल, मस्केटमध्ये पाकिस्तानचे राजनैतिक अधिकारी अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.